Marathi govt jobs   »   Study Materials   »   सर्वनाम

सर्वनाम : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

सर्वनाम : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य 

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील सर्वनाम,त्याचे प्रकार त्यांच्या व्याख्या व अधिक सरावासाठी त्यावर काही प्रश्न – उत्तरे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

सर्वनाम : विहंगावलोकन

सर्वनाम : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय मराठी व्याकरण
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव सर्वनाम
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • सर्वनामाविषयी सविस्तर माहिती
  • सर्वनामावरील प्रश्न – उत्तरे

सर्वनाम

सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द होय.

नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.

वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही.

नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते.

सर्वनामाची व्याख्या

नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.

सर्वनामांचे प्रकार

सर्वनामांचे एकूण सहा प्रकार मानतात :

  1. पुरुषवाचक सर्वनाम
  2. दर्शक सर्वनाम
  3. संबंधी सर्वनाम
  4. प्रश्नार्थक सर्वनाम
  5. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
  6. आत्मवाचक सर्वनाम

1.पुरुषवाचक सर्वनाम

बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात-

  • बोलणाऱ्यांचा
  • ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा
  • ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.

व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

  • बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे असतात. उदा – मी, आम्ही, आपण, स्वतः
  • ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे असतात. उदा- तू, तुम्ही, आपण, स्वतः
  • ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे असतात. उदा- तो, ती, ते, त्या

2.दर्शक सर्वनाम :

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास ‘दर्शक सर्वनाम’ म्हणतात.

उदा– हा, ही, हे, तो, ती, ते.

3. संबंधी सर्वनाम :

जो , जी , जे , ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत .

4. प्रश्नार्थक सर्वनाम:

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनाम’ म्हणतात. 

उदा- कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.

5. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. 

उदा.

  • कोणी कोणास हसू नये.
  • त्या पेटीत काय आहे ते सांगा.

या सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ असेसुद्धा म्हणतात.

6.आत्मवाचक सर्वनाम

आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच ‘स्वतःवाचक सर्वनाम’ असेही म्हणतात. 

उदा.

  • मी स्वतः त्याला पाहिले.
  • तू स्वतः मोटार हाकशील का?
  • तो आपणहोऊन माझ्याकडे आला.
  • तुम्ही स्वतःला काय समजता?

आपण व स्वतः – पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक :-

आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. तेव्हा यामध्ये फरक इतकाच की, पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.

सर्वनामांचा लिंगविचार

मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत.ती पुढीलप्रमाणेः मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः 

यातील लिंगानुसार बदलणारी तीनच : 1) तो, 2) हा, 3) जो.

 तो-ती–ते, हा– ही–हे , जो–जी–जे. 

याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तीनही लिंगातील रूपे सारखीच राहतात; ती बदलत नाहीत,

सर्वनामांचा वचनविचार

मराठीतील मूळ नऊ सर्वनामांपैकी ‘मी ,तू, तो, हा ,जो’ ही पाच सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.

मी – आम्ही,तू – तुम्ही; तो ,ती,ते – ते ,त्या ,ती ; हा,ही ,हे – हे ,ह्या, ही; जो,जी ,जे – जे ,ज्या, जी

  • बाकीच्या सर्वनामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच राहतात.
  • सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आले असेल, त्यावर अवलंबून असते.

प्रश्न -उत्तरे 

Q1.’तुला हवे ते तू घेया वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत?

(a)   प्रश्नार्थक सर्वनामे

(b)  अनिश्चित सर्वनामे

(c)   आत्मवाचक सर्वनामे

(d)  संबंधी सर्वनामे

Ans- (d) संबंधी सर्वनामे

Q2. ‘आपणहे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते, पण आत्मवाचक आपणहे सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनी येते.

(a)   विधानाचा पूर्वार्ध बरोबर

(b)  विधानाचा उत्तरार्ध बरोबर

(c)   संपूर्ण विधान बरोबर

(d)  संपूर्ण विधान चूक

Ans- (b) विधानाचा उत्तरार्ध बरोबर

Q3. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे –

(a)   प्रथम पुरुषवाचक सर्वनामे

(b)  आत्मवाचक सर्वनामे

(c)   द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे

(d)  तृतीय पुरुषवाचक सर्वनामे

Ans- (c) द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे

Q4. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.

ती मुलगी चांगली गाते.

(a)   मुलगी

(b)  ती

(c)   गाते

(d)  चांगली

Ans – (b) ती

Q5. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा.

(a)   तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला.

(b)  रायगडमधील दहा विद्यार्थी बोर्डात चमकले.

(c)   जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मला मिळाला.

(d)  मुलांनी आपल्या आई-वडिलांशी नम्रतेने वागावे.

 Ans- (a) तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला.

Q6. मराठीत मूळ सर्वनामे ……….आहेत.

(a)   सात

(b)  नऊ

(c)   आठ

(d)  चार

Ans- (b) नऊ

Q7. हा, ही, हे, तो, ती, ते यांना मराठी व्याकरणात काय म्हणतात?

(a)   संबंधी सर्वनामे

(b)  अनिश्चित सर्वनामे

(c)   दर्शक सर्वनामे

(d)  सामान्य सर्वनामे

Ans- (c) दर्शक सर्वनामे

Q8. वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

(a)   चार

(b)  पाच

(c)   सहा

(d)  सात

 Ans- (b) पाच

Q9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे?

अ) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.

ब) आम्ही उद्या सहलीला जाऊ.

क) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

ड) तुम्ही आता सर्वजण घरी जा.

(a)  

(b) 

(c)  

(d) 

Ans- (d)

Q10. ‘दारात कोण आहे रे?’ या वाक्यातील कोण हा शब्द कोणते सर्वनाम आहे?

(a)    संबंधी सर्वनाम

(b)    प्रश्नार्थक सर्वनाम

(c)     सामान्य सर्वनाम

(d)    आत्मवाचक सर्वनाम

Ans- (b) प्रश्नार्थक सर्वनाम

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

स्पर्धा परीक्षेत मराठीतील सर्वनामावर प्रश्न विचारले जातात का ?

होय,स्पर्धा परीक्षेत मराठीतील सर्वनामावर हमखास प्रश्न विचारले जातात.

सर्वनाम म्हणजे काय ?

नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.

इतका महत्त्वाचा लेख कुठे मिळेल?

Adda 247 मराठीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांच्या सूचना, अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यास साहित्य मिळेल.