Table of Contents
प्राचीन भारतातील शिक्षणाची केंद्रे : Centers of Education in Ancient India
तक्षशिला विद्यापीठ : तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्याच्या आधारे ते इ.स.पू. सहाव्या शतकात वसवले गेले, असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इ.स.पू. चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चिनी बौद्ध भिक्खू फाहियान इ.स.४०० च्या सुमारास भारतात आला होता. त्या वेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई.
वाराणसी : वरणा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्या आहेत. या दोन नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती.
वलभी : गुजरातमधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन श्वांग आणि इत्सिंग या चिनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती.
नालंदा विद्यापीठ : आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदारहस्ते देणग्या दिल्या होत्या. युआन श्वांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे.
विक्रमशीला विद्यापीठ : विक्रमशीला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकात केली. तिथे सहा विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.
कांची : पल्लव राजसत्तेच्या काळात (इ.स.६वे शतक) आजच्या तमिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई.
MPSC परीक्षेसाठी इतर महत्वाचे लेख
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक