Marathi govt jobs   »   Study Materials   »   अलंकार

अलंकार | अन्न व नागरी पुरवठा विभाग भरतीसाठी अभ्यास साहित्य

अलंकार

अलंकार: अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2023 च्या परीक्षेत मराठी विषयास अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे आगामी काळातील MIDC भरती 2023 व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ आणि क्रियापदाचे अर्थ, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि प्रयोग याबद्दल आपण याआधी माहिती पहिली. आज आपण या लेखात मराठी व्याकरणातील महत्वाचा घटक अलंकार याबद्दल माहिती पाहणार आहे.

अलंकार: विहंगावलोकन 

अलंकार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव अलंकार
लेखातील प्रमुख मुद्दे
  • अलंकार
  • प्रकार
  • नमुना प्रश्न

अलंकार

अलंकार: अलंकार या शब्दाचा अर्थ ‘दागिना’ असा आहे. दागिने घातल्यामुळे माणसाच्या शरीराला शोभा येते.त्याच्या सौंदर्यात भर पडते.त्याचे रूप अधिक सुंदर,देखणे,प्रभावी बनत असते. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची.भाषा अधिक परिणामकारक बनावी किंवा चांगली दिसावी म्हणून भाषेत अलंकारीक शब्दाचा वापर करतो.

उदा. ‘तुझे चालणे मोहक आहे.’असे न म्हणता ‘चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले’अशी रचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना उठावदार दिसून कानाला गोड वाटते. म्हणून ज्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.

अलंकाराचे प्रकार

मराठीत अलंकाराचे प्रमुख दोन प्रकार पडतात.

  • शब्दालंकार
  • अर्थालंकार

शब्दालंकार

शब्दालंकार: जे अलंकार शब्दांवर,त्यातील अक्षरे वा स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. शब्दालांकाराचे उपप्रकार खालीलप्रमाणे आहे.

अनुप्रास अलंकार: जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्मिती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदा. काकांच्या कामाची कागदपत्रे काकींनी कात्रीने कराकरा कापली.

यमक अलंकार: जेव्हा पद्य चरणाच्या शेवटी,मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा ‘यमक’ अलंकार होतो. उदा. सुसंगति सदा घडो,सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतिचा झडो,विषय सर्वथा नावडो ||

श्लेष अलंकार: श्लेष याचा अर्थ मिळणे ,जुळणे ,भेटणे,मिठी मारणे असा आहे. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यात एका शब्दाला एकाहून अधिक अर्थ जडलेले असतात तेव्हा श्लेष अलंकार होतो. एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्याने शब्द चमत्कृती साधने , तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदा. मित्राच्या उदयाने मनाला आनंद होतो . येथे मित्राचे विविध अर्थ लागू होतात जसे मित्र – सूर्य, मित्र – स्नेही, मित्र – दोस्त -सखा

अर्थालंकार

अर्थालंकार: जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात अर्थालंकार म्हणतात. अर्थालंकाराचे उपप्रकार खालीलप्रमाणे आहे.

उपमा अलंकार: जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दाखविलेला असतो तेव्हा ‘उपमा अलंकार’ होतो. उदा. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे|

  • ज्याची तुलना करावयाची त्याला उपमेय म्हणतात
  • ज्याच्याशी तुलना करावयाची त्याला उपमान म्हणतात
  • दोन वस्तूंमधील सारखेपणाला साधारणधर्म म्हणतात
  • सारखेपणा दाखविनाऱ्या शब्दाला साम्यवाचक शब्द म्हणतात

उत्प्रेक्षा अलंकार: ‘उपमेय’ हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा ‘उत्प्रेक्षा’ अलंकार होतो. उदा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

रूपक अलंकार: उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे,ती भिन्न नाहीत .असे वर्णन जिथे असते, तिथे रूपक हा अलंकार असतो. ( उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन असते.) उदा. लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

व्यतिरेक अलंकार: उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक अलंकार होतो. उदा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.

स्वभावोक्ती अलंकार: एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे,प्राण्याचे,स्थळाचे वा अविर्भावांचे हुबेहूब वर्णन कवी करतो तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो.

उदा. मातीत ते पसरले अतितम्य पंख

केले वरी उदर पांडुर निष्कलंक

चंचू तशीच उघडी पद लांबविले

निष्प्राण देह पडला श्रमही निमाले

अतिशयोक्ती अलंकार: वाक्यातील मूळ कल्पना आहे त्यापेक्षा फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उदा. वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले.

चेतनगुणोक्ती अलंकार: निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.उदा. डोकी अलगद घरे उचलती | काळोखाच्या उशीवरूनी||

अनन्वय अलंकार: उपमेय हे उपमानासारखेच असते. त्याला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही. असे वर्णन आले की अनन्वय अलंकार होतो. उदा. आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी

दृष्टांत अलंकार: दृष्टांत म्हणजे दाखला.एखाद्या गोष्टीच्या स्पष्टीकरणासाठी दुसऱ्या गोष्टीचा दाखला दिला जातो तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. उदा. लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |

अपन्हुती अलंकार: एखादी वस्तू पाहूनही ती वस्तू नसून दुसरीच आहे म्हणजे उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन आले असता अपन्हुती अलंकार होतो. उदा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील.

अर्थांतरण्यास अलंकार: जेव्हा एखाद्या सामान्य गोष्टीच्या समर्थनार्थ एखादी विशिष्ट गोष्ट सांगितलेली असते किंवा एखाद्या विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ एखादा सामान्य सिद्धांत सांगितलेला असतो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. उदा. आली जरी कष्टदशा अपार , न टाकिती धैर्य तथापि थोर

अन्योक्ती अलंकार: जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये अगर पद्यात दुसऱ्याला स्पष्टपणे न बोलता उद्देशून बोललेले असते तेव्हा अन्योक्ती अलंकार होतो. उदा. सरड्याची धाव कुंपनापर्यंत.

अलंकार: नमुना प्रश्न

प्रश्न 1. पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे? 

“कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी, जवळुन वार केला ।।”

a) दृष्टांत

b) उपमा

c) यमक

d) श्लेष

उत्तर(a)

प्रश्न 2. ‘गणपत वाणी विडी पितांना, चावायचा नुसतिच काडी; म्हणायचा अन् मनाशीच की, हह्या जागेवर बांधिन माडी’ या काव्यरचनेतील अलंकार ओळखा.

a) रूपक

b) स्वभावोक्ती

c) उत्प्रेक्षा

d) श्लेष

उत्तर(b)

प्रश्न 3. ‘अमृताहूनि गोड नाम तुझे देवा’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

a) दृष्टांत

b) व्यक्तीरेक

c) अनन्वय

d) श्लेष

उत्तर(b)

प्रश्न 4. ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी!’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

a) दृष्टांत

b) व्यक्तीरेक

c) उपमा

d) श्लेष

उत्तर(c)

प्रश्न 5. ‘हा आंबा प्रत्यक्ष साखरच’ या वाक्यातील उपमान ओळखा.

a) आंबा

b) साखरच

c) प्रत्यक्ष

d) साखर

उत्तर(d)

प्रश्न 6. मित्राच्या उदयान कोणाला आनंद होत नाही? या विधानातील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा.

a) उपमा

b) उत्प्रेक्षा

c) श्लेष

d) यमक

उत्तर(c)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

अलंकाराचे प्रमुख प्रकार कोणते?

अर्थालंकार आणि शब्दालंकार हे अलंकाराचे प्रमुख प्रकार आहेत.

अर्थालंकार म्हणजे काय?

जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात अर्थालंकार म्हणतात.

शब्दालंकार म्हणजे काय?

जे अलंकार शब्दांवर,त्यातील अक्षरे वा स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात.