भाषा कोणतीही असो, ती संस्काराचे, संस्कृतीचे आणि विकासाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातून आजचा मानव अत्याधुनिक बनला आहे. आपले मत, आपले विचार दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण आणि सशक्त माध्यम म्हणजे भाषा. संपूर्ण विश्वात हजारो भाषा बोलल्या जातात. प्रामुख्याने प्रमाण आणि बोली ही दोन त्यांची रूपे. प्रमाणभाषा ही प्रशासकीय मानली जाते तर बोलीभाषा ही व्यवहारात वा परस्परांशी संवाद साधताना वापरली जाते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. किंबहुना, तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या भाषांसोबत आता मराठी भाषेचा वापर ‘इंटनेट’ चा उपयोग करणाऱ्यांकडून होतो आहे, ही मराठी भाषक म्हणून आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब होय. महाष्ट्रातील मराठी भाषा (Marathi Bhasha Gaurav Din) आणि इथल्या संतांची परंपरा हेच शिरवाडकरांच्या श्रद्धेचे विषय होते.
Marathi Bhasha Gaurav Din: महाकवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन 2000 पासून 21 फेब्रुवारी हा ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. या दोन्ही सुदिनाचे औचित्य साधून 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या मायबोलीच्या सन्मानाचे आहेत.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे. मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. ते अनेकदा म्हणायचे समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. मातृभाषेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यामुळे मुलांना कुटुंब, समाज यांच्याविषयी आस्था, वाचनाची गोडी, कविता आणि सामाजिक समरसता निर्माण होते. पण गेल्या दशकापासून इंग्रजी माध्यमातील शिक्षण पाल्याला देण्यावर पालकांचा भर आहे. काही पालकांना वाटते की मराठी किंवा मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे उच्च शिक्षणात इंग्रजी माध्यम असल्यामुळे समस्या निर्माण होईल. पण पालकांच्या आग्रहामुळे मुलाला नीट इंग्रजीही येत नाही वा पूर्णपणे आपली मातृभाषाही बोलता येत नाही. आजच्या घडीला शिक्षणाच्या विकासाचा जो डोंगर निर्माण झाला आहे. त्याला जागोजागी भाषेने आधार दिला आहे. शिक्षण शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की, शिक्षण मातृभाषेतून दिले जावे. आपल्या आजूबाजूला उच्च शिक्षण घेतलेले संशोधक, डॉक्टर, अभियंता झालेले पाहिले तर त्यांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन प्रगती केली आहे. मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. त्यामुळे मुलांना मातृभाषेवर व बोलीभाषेवर प्रेम करायला शिकवा. हेच वारंवार कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून पटवून देण्याचा अट्टाहास केला आहे.
आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
—————————————————————————————————————-