Marathi govt jobs   »   Study Materials   »   वर्णमाला आणि शब्दांच्या जाती

वर्णमाला आणि शब्दांच्या जाती | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

वर्णमाला आणि शब्दांच्या जाती

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. आगामी काळातील अन्न व नागरी पुरवठा भरती 2023 व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील वर्णविचार, स्वर व व्यंजन म्हणजे काय व त्यांचे प्रकार, शब्द व शब्दांच्या जाती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

वर्णमाला आणि शब्दांच्या जाती
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता अन्न व नागरी पुरवठा भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय मराठी भाषा
लेखाचे नाव स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण
घटक
  • वर्णमाला
  • शब्दांच्या जाती

वर्णमाला आणि शब्दांच्या जाती

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. पतंजलीने व्याकरणास ‘शब्दानुशासन’ असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध व समजण्यास सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो, ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते. वि + आ + कृ (=करण) = व्याकरण या शब्दाचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण असा होतो. 

व्याकरणाची व्याख्या: भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.

वर्णमाला

वर्णमाला: तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण 52 वर्ण आहेत. ते खालीलप्रमाणे

स्वर: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:, ॲ, ऑ

व्यंजन: क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

(मराठीत मुळचे 48 वर्ण होते. पण महाराष्ट्र शासन निर्णया नुसार ॲ, ऑ हे इंग्लिश मधील स्वर . व क्ष, ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन या 4 वर्णाचा वर्णमालेत समावेश करण्यात आला.)

स्वर आणि व्यंजन यांचे उपप्रकार आहेत ते खालील तक्त्यात दिले आहे.

स्वरांचे प्रकार

स्वरांचे प्रकार
र्‍हस्व स्वर
  • अ, इ, ऋ, उ
दीर्घ स्वर
  • आ, ई, ऊ,
संयुक्त स्वर
  • ए – अ+इ/ई
  • ऐ – आ+इ/ई
  • ओ – अ+उ/ऊ
  • औ – आ+उ/ऊ
स्वरादी
  • अं, अः

व्यंजनाचे प्रकार

व्यंजनाचे प्रकार
स्पर्श व्यंजने क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
कठोर व्यंजने क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
मृदू व्यंजने ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
अनुनासिके ड, त्र, ण, न, म

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती: अर्थपूर्ण अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. शब्दांना प्रत्यय जोडून ती वाक्यात वापरल्यास त्यांना पद असे म्हणतात. व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात. तर शब्दाला प्रत्यय जोडून बदल केल्यास विकृती असे म्हणतात. या प्रकृती व विकृती नुसार शब्दांच्या जाती 8 प्रकारात विभागल्या गेल्या आहे.

शब्दांच्या जाती :

विकारी शब्द: लिंग, वचन व विभक्ती मुळे ज्या शब्दात बदल होतो त्यास विकारी शब्द असे म्हणतात.
(नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद)

अविकारी शब्द: लिंग, वचन व विभक्ती मुळे ज्या शब्दात बदल होत नाही त्यास विकारी शब्द असे म्हणतात.

नाम

नाम: सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. नामाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

नामाचे प्रकार: 

  1. सामान्य नाम
  2. विशेष नाम
  3. भाववाचक नाम

सामान्य नाम: एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात. उदा. घर, मुलगी, पाणी, सोने

सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.

  1. पदार्थवाचक नाम: तांबे, कापड, पीठ
  2. समूहवाचक नाम: जुडी, ढिगारा

विशेष नाम: ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात. उदा. राम, निखील, औरंगाबाद

भाववाचक नाम: ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात. उदा. सौंदर्य, धैर्य, गर्व

सर्वनाम

सर्वनाम: वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामाचे प्रकार खालीलप्रमाणे आहे.

  1. पुरुषवाचक सर्वनाम
  2. दर्शक सर्वनाम
  3. संबंधी सर्वनाम
  4. प्रश्नार्थक सर्वनाम
  5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
  6. आत्मवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनाम: पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात.

  • प्रथम पुरुषवाचक : स्वतः चा उल्लेख करणे (मी, आम्ही, आपण)
  • द्वितीय पुरुषवाचक : समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करणे (तू, तुम्ही)
  • तृतीय पुरुषवाचक : तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करणे (तो, ती, ते)

दर्शक सर्वनाम: जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.

संबंधी सर्वनाम: वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदा.जो, जी, जे, ज्या

प्रश्नार्थक सर्वनाम: ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदा. कोण, कुणास, काय, कोणी

सामान्य / अनिश्चित सर्वनाम: कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. उदा. कोणी कोणास चीडवू नये.

आत्मवाचक सर्वनाम: एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. स्वतः

विशेषण

विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे प्रकार: विशेषणाची प्रमुख तीन प्रकार पडतात

  1. गुणवाचक विशेषण
  2. संख्यावाचक विशेषण
  3. सार्वनामिक विशेषण

गुणवाचक विशेषण: नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात. उदा. सुंदर, गोड, कडू

संख्यावाचक विशेषण: ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.संख्यावाचक विशेषणाचे प्रकार व उदा. खाली दिलेली आहे

  • गणनावाचक: एक, दोन,
  • क्रमवाचक: पहिला, पाचवा
  • आवृत्तिवाचक: द्विगुणीत
  • पृथ्वकत्व वाचक: एक एक
  • अनिश्चित: काही, सर्व

सार्वनामिक विशेषण: सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदा. हे, ते, असले

क्रियापद

क्रियापद: वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

क्रियापदाचे प्रकार

  • सकर्मक क्रियापद
  • अकर्मक क्रियापद

सकर्मक क्रियापद: ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदा. पक्षी मासा पकडतो.

अकर्मक क्रियापद: ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते. म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते त्यांना ‘अकर्मक क्रियापदे’ असे म्हणतात. उदा. ते उठले.

क्रियाविशेषण

क्रियाविशेषण: क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्‍या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.

क्रियाविशेषणाचे प्रकार

अ. क्र. क्रियाविशेषणाचे प्रकार क्रियाविशेषण अव्यय
1 कालवाचक क्रियाविशेषण
कालदर्शक आधी, सध्या, पूर्वी
सातत्यदर्शक नित्य, सदा, नेहमी
आवृत्तीदर्शक दररोज, पुन्हापुन्हा
2 स्थलवाचक क्रियाविशेषण
स्थितीदर्शक येथे, तेथे, जेथे, वर, खाली
गतिदर्शक इकडून, तिकडून, मागून, पुढून
3 रितीवाचक क्रियाविशेषण असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट
4 परिमाणवाचक क्रियाविशेषण कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित
5 प्रश्नार्थक क्रियाविशेषण का, ना, केव्हा
6 निषेधार्थक क्रियाविशेषण न, ना

शब्दयोगी अव्यये

शब्दयोगी अव्यये: वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्‍या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.

शब्दयोगी अव्यय प्रकार

  • कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत.
  • स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.
  • करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती
  • हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव
  • व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता
  • तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
  • योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम
  • कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ
  • संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त
  • संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी
  • साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत
  • भागवाचक – पैकी, पोटी, आतून
  • विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली
  • दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी
  • विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट
  • परिणाम वाचक – भर

उभयान्वयी अव्यये

उभयान्वयी अव्यये: दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.

  1. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.
  2. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये: यांचे पुढील 4 प्रकार पडतात.

1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय: दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा व, आणि

2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा वाक्यांना जोडणारी अथवा, वा, की, किंवा, ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात म्हणजेच हे किंवा ते किंवा त्यापैकी एक असा अर्थ सूचित करतात अशा अव्ययांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, किवा, अगर

3. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी पण, परंतु, परी, बाकी, ही अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. परंतु, पण, बाकी, किंतु

4. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा दोन वाक्यांना जोडणार्‍या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणार्‍या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, याकरिता, सबब

असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये: यांचे पुढील 4 प्रकार पडतात.

1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय: उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, म्हणजे, की

2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे हे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, सबब, यास्तव

3. करणबोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा कारण, व, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारण बोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, का, की इत्यादी.

4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय:  जेव्हा मुख्य गौण वाक्ये जर-तर किंवा जरी-तरी या उभयान्वयी अव्ययामुळे जोडली जाऊन तायातून संकेत व्यक्त होत असेल त्या अव्यवयांना संकेत बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. जर-तर

केवल प्रयोगी अव्यय

केवल प्रयोगी अव्यय: आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. त्याचे प्रकार व उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

  • हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
  • शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
  • आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
  • प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी
  • संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
  • विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
  • तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
  • संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

वर्णमाला आणि शब्दांच्या जाती: नमुना प्रश्न

प्रश्न1. खालील पैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा.

(a) अ-इ

(b) उ-ऊ

(c) आ-ए

(d) इ-उ

उत्तर(b)

प्रश्न2. खालील पैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा.

(a) इ-ई

(b) उ-ऊ

(c) आ-ए

(d) अ-आ

उत्तर(c)

प्रश्न 3. मी परवा गावाला जाईल.  या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

(a) गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय

(b) सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय

(c) कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय

(d) आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर- (c)

प्रश्न 4. उद्यापासून मी अभ्यास करणार आहे. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

(a) गतिवाचक शब्दयोगी अव्यय

(b) स्थलवाचक शब्दयोगी अव्यय

(c) करणवाचक शब्दयोगी अव्यय

(d) योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय

उत्तर- (a)

प्रश्न 5. तुला पेन हवा कि पेन्सिल? या वाक्यातील अव्यय ओळखा.

(a) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

(b) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

(c) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय

(d) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर- (b)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

व्याकरण म्हणजे काय?

भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.

विकारी शब्दाचे प्रकार कोणते?

विकारी शब्दाचे प्रकार नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही आहेत.

अविकारी शब्दाचे प्रकार कोणते?

अविकारी शब्दाचे प्रकार क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवलप्रयोगी अव्यय ही आहेत.