Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील लोकजीवन
Top Performing

महाराष्ट्रातील लोकजीवन: WRD भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील लोकजीवन

महाराष्ट्रातील लोकजीवन: मोठ्या शहरांत व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. उदा. मुंबई, पुणे, नागपूर, नदीखोऱ्यांच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त आहे. याद्वारे लोकसंख्या कोणत्या भागात दाट किंवा विरळ आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक प्रदेशात विविधता आहेत. याच करणामुळे महाराष्ट्रातील लोकजीवन हे वैविध्यांनी नटलेले आहे. महाराष्ट्रातील लोकजीवन हा महाराष्ट्राच्या प्रकृतील भूगोलामधील एक महत्वपूर्ण घटक आहे. आगामी काळातील WRD जलसंपदा भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा फार महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण याच विज्ञानांतील प्रमुख घटक महाराष्ट्रातील लोकजीवन याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील लोकजीवन: विहंगावलोकन

महाराष्ट्रातील लोकजीवन हे वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक विभागानुसार महाराष्ट्रातील राहणीमानात विविधता आहे. तेथील घरांची रचना, शेती आणि पोशाख यात फरक आढळतो. महाराष्ट्रातील लोकजीवनाबद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लोकजीवन: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय महाराष्ट्राचा भूगोल
उपयोगिता WRD आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव महाराष्ट्रातील लोकजीवन
लेख तुम्हाला काय प्रदान करतो
  • कोकणातील लोकजीवन
  • पठारी प्रदेशातील लोकजीवन
  • आदिवासी लोकजीवन
  • महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र

लोकजीवन म्हणजे काय?

लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकांवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते. यालाच लोकजीवन म्हणतात. ग्रामीण व शहरी लोकजीवनांत बराच फरक आढळतो. शहरी भागात लोकवस्ती दाट असते. शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

शहरातील लोकांचे राहण्याचे व कामाचे ठिकाण यांत अंतर असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा, वाहतूक व इतर सार्वजनिक सुविधांवर ताण पडतो. ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. या भागातील लोकवस्त्या लहान असतात. यावरून शहरी व ग्रामीण भागांतील लोकजीवनात फरक असतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या लेखात महाराष्ट्रातील कोकण, पठारी प्रदेश, तसेच आदिवासी भागांमधील लोकजीवनाविषयी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील लोकजीवन: कोकण

कोकणातील लोकजीवन: कोकणात भरपूर पर्जन्य पडतो, म्हणून येथील घरे उतरत्या छपरांची व कौलारू असतात. काही ठिकाणी जांभा दगडांच्या भिंती असलेली घरे आढळतात. कोकणातील लोक प्रामुख्याने शेती करतात. समुद्रकिनाऱ्यालगत कोळी समाजाच्या अनेक वस्त्या आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे, म्हणून येथील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो. तसेच नाचणीची भाकरी, विविध डाळी, भाजीपाला यांचाही समावेश असतो. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व मासे असतात.

येथील हवामान उष्ण व दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. पुरुष शर्ट-पँट, पायजमा, बंडी इत्यादी पोशाख वापरतात, तर स्त्रिया ब्लाउज साडी वापरतात. समुद्रकिनाऱ्यालगतचे कोळी लोक बंडी, पैंट, रुमाल व विशिष्ट आकाराची टोपी वापरतात. येथे प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. कोकणात होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित होतात.

महाराष्ट्रातील लोकजीवन: पठारी प्रदेश

पठारी प्रदेशातील लोकजीवन: पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने येथील घरे प्रामुख्याने सपाट छतांची असतात. ही छते धाब्याची, कौलांची किंवा पत्र्यांची असतात. घरे मातीची किंवा सिमेंटची असतात. शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. त्याबरोबरच पशुपालन हा जोडव्यवसाय केला जातो. काही ठिकाणी कुटीरोद्योग केले जातात. शहरी भागात नोकरी, व्यवसाय, कारखानदारी केली जाते.

पठारी प्रदेशातील लोकांच्या आहारात मुख्यतः ज्वारी, बाजरीची भाकरी, तसेच विविध प्रकारच्या डाळी, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असतो, मात्र राज्याच्या पूर्व भागात लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो त्याबरोबरच पोळ्या विविध प्रकारच्या डाळी यांचादेखील समावेश असतो.

पठारी प्रदेशातील हवामान उष्ण, कोरडे व विषम असल्यामुळे येथील लोक सुती कपडे वापरतात. येथील पुरुष शर्ट-पँट वापरतात. स्त्रिया ब्लाउज साडी वापरतात. याशिवाय सदरा, पायजमा, धोतर, टोपी इत्यादींचाही वापर केला जातो. तरुण मुले-मुली आधुनिक पोशाख करतात. या भागात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. होळी, दसरा-दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात. विविध धर्मीय लोक आपापले सण साजरे करतात.

महाराष्ट्रातील आदिवासी लोकजीवन

आदिवासी लोकजीवन: आदिवासी लोकजीवन फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. आदिवारी लोक ज्या भागात राहतात त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनांवर ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोली भाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. राज्यातील विविध प्रदेशांत आढळणाऱ्या प्रमुख आदिवासींची माहिती खाली देण्यात आली आहे. साधारणपणे आदिवासींची घरे गवत, बांबू झाडांच्या फाट्या, पाने इत्यादींपासून बनवलेली असतात. त्यांच्या वस्त्यांना विविध भागांत वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थ, पाडा, पौड, टोला, झाप ई.

आदिवासी जमातीतील बरेच लोक प्रामुख्याने वनातील लाकूड, बांबू, तेंदूपत्ता, वनौषधी, डिंक, मध इत्यादी वनोत्पादन गोळा करतात. अलीकडे काही लोक शेती करू लागले आहेत. आदिवासींच्या आहारात परिसरातील उपलब्धतेनुसार भात, नाचणी, वरी, वाल, चवळी, हुलगे, बाजरी, उडीद, मूग, तूर ही धान्ये असतात. आदिवासींच्या पोशाखातही विविधता असते. पुरुष आखूड धोतर, बंडी, पागोटे, तर स्त्रिया साडी- चोळी व त्यांचा पारंपरिक पोशाख वापरतात. विविध रंगांची पक्ष्यांची पिसे, मणी. कवड्या व चांदीचे दागिने वापरतात. वेगवेगळ्या भागांतील आदिवासी आपली पारंपरिक भाषा बोलतात. बहुतांशी आदिवासी निसर्गपूजक असून त्यांच्या देवदेवतांची नावे निसर्गाशी संबंधित असतात. त्यांचे नृत्य, गाणी, दागिने, पोशाख, सण, उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतात. याशिवाय राज्यात बंजारा, लमाण, पारधी, कैकाडी, धनगर इत्यादी प्रमुख भटक्या जमाती आहेत. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यांमध्ये विविधता असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते.

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र
प्रमुख आदिवासी जमाती वास्तव्य असणारा प्रदेश
गोंड चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड
भिल्ल ‘धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश, तसेच अहमदनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग.
कोकणा नाशिक, धुळे जिल्ह्यांचा डोंगराळ भाग.
कोकरू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश
वारली ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश.
ठाकर, महादेव कोळी पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील डोंगराळ व पठारी प्रदेश
आंध परभणी, नांदेड, अकोला आणि यवतमाळ
कोलम महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश

महाराष्ट्रातील लोकजीवनावरील काही वस्तुनिष्ट प्रश्न 

Q1. कोणत्या भागातील घरे उतरत्या छपरांची व कौलारू असतात?

(a) मराठवाडा

(b) उत्तर महाराष्ट्र

(c) कोकण

(d) विदर्भ

S1. Ans. (c)

Sol. कोकणात भरपूर पर्जन्य पडतो, म्हणून येथील घरे उतरत्या छपरांची व कौलारू असतात. काही ठिकाणी जांभा दगडांच्या भिंती असलेली घरे आढळतात.

Q2. कुठेले हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे?

(a) कोकण

(b) मराठवाडा

(c) विदर्भ

(d) पठारी प्रदेश

S2. Ans. (d)

Sol. पठारी प्रदेशाचे हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे.

Q3. कोणत्या विभागात अहिरणी भाषा बोलल्या जाते?

(a) नाशिक

(b) पुणे

(c) गडचिरोली

(d) यवतमाळ

S3. Ans. (a)

Sol. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते.

Q4. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात कोणती आदिवासी जमात वास्तव्य करते?

(a) वारली

(b) कोकरू

(c) भिल्ल

(d) गोंड

S4. Ans. (b)

Sol.अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात कोकरू आदिवासी जमात वास्तव्य करते.

Q3. कोणत्या विभागात मालवणी भाषा बोलली जाते?

(a) यवतमाळ

(b) पुणे

(c) कोकण

(d) नाशिक

S3. Ans. (c)

Sol. कोकणात मालवणी भाषा बोलली जाते.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

महाराष्ट्रातील लोकजीवन: WRD भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

लोकजीवन म्हणजे काय?

लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकांवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते. यालाच लोकजीवन म्हणतात.

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती अधिवासी जमात राहते?

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोलाम अधिवासी जमात राहते.