Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, WRD भरती साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार: या लेखात आपण महाराष्ट्रातील विविध वने व वनांचे प्रकार, महाराष्ट्रातील विविध प्रकारचे जंगल, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि महाराष्ट्रातील अभयारण्य यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती अभ्यासू.

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार
श्रेणी अभ्यास साहित्य
कशासाठी उपयुक्त WRD भरती 2023
विषय अभ्यास साहित्य (भूगोल)
टॉपिक महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार: स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल विषयाचा अभ्यास करताना महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये या विषयवार बऱ्याचदा प्रशा विचारले जातात. WRD जलसंपदा विभाग आणि तसेच महाराष्ट्रातील इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी विविध विषयवार अभ्यास साहित्याचे लेख तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. तर चला मग या लेखात आपण अभ्यास करूयात महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार. या लेखात आपण पाहुयात वने व वनांचे प्रकार.

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार

महाराष्ट्रात वनस्पतींचे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण प्रकार पाहावयास मिळतात. ते पुढील प्रमाणे :

  1. उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
  2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये
  3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
  4. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये किंवा उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये
  5. उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्ये
  6. उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये
महाराष्ट्रात वनस्पतींचे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण प्रकार
महाराष्ट्रात वनस्पतींचे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण प्रकार

1. उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:

वार्षिक पर्जन्य: सुमारे 200 से. मी. किंवा त्याहीपेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात

प्रदेश: महाराष्ट्रामध्ये कोकण भागात सह्याद्रीच्या पायथ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित अरण्ये पाहावयास मिळतात.

वृक्षांचे स्वरूप :

  • घनदाट वनांचे आच्छादन वृक्षांची उंची साधारण 45 ते 60 मी.
  • उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने ही नेहमी सदाहरीत व अतिदाट असतात.
  • या वन प्रकारातील वृक्षांना वरच्या बाजूस पाने व फांद्या भरपूर असतात व त्या एकमेकांत आच्छादलेल्या असतात.
  • वृक्षे ही दाटीवाटीने व सलग वाढलेली असतात.

वृक्षांचे प्रकार: सदाहरित अरण्यांमध्ये नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ वगैरे वृक्ष आढळतात, त्या घनदाट अरण्यात अधूनमधून बाबू आणि कळक यांचे विविध प्रकार आहेत.

आर्थिक महत्त्व :

  • या वनस्पती आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या नसतात.
  • या वन प्रकारातील लाकूड कठीण असते.
  • या ठिकाणी फळे, कंदमुळे, पाने इत्यादी वनस्पती मिळून त्याचा व्यापार केला जातो.
  • येथील वृक्षांचा वापर बहुतकरून इंधनासाठी व जळाऊ लाकूड म्हणून केला जातो. दळणवळणाच्या अपुन्या सोयींमुळे या ठिकाणी फारसा वनउद्योगाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही म्हणून ही वने आर्थिकदृष्ट्या फारशी महत्त्वाची नाही.

2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये:

वार्षिक पर्जन्य: 200 सें. मी. पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात.

प्रदेश: पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे सहयाद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात. विशेषतः आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित अरण्ये आहेत. सदाहरित अरण्ये आणि पानझडीची अरण्ये यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत.

वृक्षांचे स्वरूप:

  • सदाहरीत वन प्रकारातील वृक्षांपेक्षा कमी उंचीची वृक्ष असतात.
  • वृक्षांची उंची साधारणतः 20 ते 30 मी. एवढी असते.
  • या प्रकारची वने सलग पट्ट्यात न वाढता तुटक स्वरूपात वाढतात.
  • सर्वच वृक्षांची पाने ही एकाच वेळी गळून पडत नाहीत. विशिष्ट कालावधीने ती गळतात. म्हणून ही वने हिरवीगार दिसतात.

वृक्षांचे प्रकार:  निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदंब, शिसम, बिबळा वगैरे वृक्ष आढळतात. बांबूची वने कमी प्रमाणात आहेत.

आर्थिक महत्त्व:

  • ही वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत.
  • येथील वृक्षांच्या लाकडाचा वापर हा मुख्यत्वे इमारत व फर्निचरसाठी केला जातो.
  • येथील लाकूड जळाऊ इंधन म्हणून वापरले जाते.
  • महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर परिसरात मध गोळा करण्याचा व्यवसाय चालतो.

3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:

वार्षिक पर्जन्य: प्रदेश सहयाद्री पर्वतावर 250 से. मी. पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत.

प्रदेश: माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकडयांवरही ही अरण्ये आहेत.

वृक्षांचे स्वरूप:

  • वृक्षांचे लाकूड मऊ असते.
  • अनेक प्रकारची वृक्ष, वेली, झुडपी या भागात असतात. त्यामुळे ती हिरवी दिसतात.
  • वृक्षांची विविधता या ठिकाणी जास्त असते.

वृक्षांचे प्रकार: वृक्षांचे प्रकार उपउष्ण सदाहरित अरण्यात जांभळा, मंजन, हिरडा, आंबा, भेडा, कारवी वगैरे महत्वाचे वृक्ष आहेत.

आर्थिक महत्त्व:

  • वन औषधी तयार करणे व तिचा विक्रीचा व्यवसाय करणे.
  • मध गोळा करणे व मधुमक्षिका पालन केंद्र चालविणे.
  • विविध प्रकारची फुले गोळा करून वनौषधी, पेय तयार करणे.

4. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये किंवा उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:

वार्षिक पर्जन्य: वार्षिक पाऊस 120 से 160 से.मी

प्रदेश: महाराष्ट्रात जी अरण्ये प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्यांच्या पूर्व भागात चिरोली आणि नवेगाव टेकड्यांवर आहेत. तो परिसर ‘आलापल्लीची अरण्ये’ म्हणून ओळखला जातो. याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्हयाचा काही भाग, सातपुडा  पर्वतरांगांतील गाविलगड टेकड्या (मेळघाट) यांचा समावेश होतो. उत्तर कोकणातील डोंगररांगा, तसेच सह्याद्री चा घाटमाथा, पर्जन्यछायेचा प्रदेश, शंभू महादेव डोंगररांगा हरिश्चंद्र- बालाघाट आणि सातमाळा डोंगररांगा या ठिकाणी आर्द्र पानझडी अरण्ये पाहावयास मिळतात. कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पुसे व नंदुरबार जिल्ह्यात पानझडी अरण्ये आहेत

वृक्षांचे स्वरूप:

  • ही वने पावसाळ्यात वाढतात, तर उन्हाळ्याच्या सुरवातीला यांची पाने गळतात.
  • झाडांची सरासरी उंची 30 ते 40 मीटर.
  • पावसाळा सुरू झाल्यानंतर वृक्षांना नवीन पालवी फुटतात. या प्रकारची वने फार घनदाट नसतात.
  • वनातील वृक्षे मऊ लाकडाची असतात.

वृक्षांचे प्रकार: आर्द्र पानझडी अरण्यात प्रमुख वनस्पती सागवान आहेत. याशिवाय आईन, हिरडा, बिबळा, लेंडी, येरूल, किंडल, कुसुम, आवळा, शिसम, सिरस वगैरे वृक्ष आढळतात. बांबूची वनेही पाहावयास मिळतात. व्यवहारात ते वासे म्हणून प्रसिद्ध आहेत.

आर्थिक महत्त्व:

  • ही वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असतात.
  • सागाच्या लाकडाचा वापर इमारती लाकूड व फर्निचरसाठी होतो.
  • डिंक, लाख, मध गोळा करणे, तेंदूची पाने गोळा करणे, मोहाची फुले गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतो.
  • लाकूड कटाई उद्योगासाठी ही वने महत्त्वाची असतात.
  • वनौषधी, वनफुले इत्यादी विक्रीचा व्यवसाय या वन प्रकारात चालतो.

5. उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्ये:

वार्षिक पर्जन्य: 80 ते 120 सें. मी. असणाऱ्या प्रदेशात रूक्ष पानझडी अरण्ये आढळतात

प्रदेश:  सातपुडा पर्वतरांगा आणि अजिंठा डोंगररांगांत रूक्ष पानझडी अरण्ये आढळतात. घाटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालगत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यांवरही ही अरण्ये पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे विदर्भामध्येही डोंगराळ भाग व्यापलेला आहे

वृक्षांचे स्वरूप:

  • ही वने अतिशय विरळ असतात. वृक्षांना काटे असतात.
  • मध्यम उंचीची व झुडपांच्या स्वरूपात आढळतात.
  • विशिष्ट अंतरावर या वनातील वृक्ष आढळतात.
  • वनातील वृक्षांची पाने ही उन्हाळ्याच्या सुरवातीला गळतात.

वृक्षांचे प्रकार: उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्यात सागवान, धावडा, शिसम, तेंदू, पळस, बेल, खेर, अंजन वगैरे वृक्ष असतात.

आर्थिक महत्त्व:

  • सागवान लाकडाचा समावेश असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही वने महत्त्वाची असतात.
  • मध, डिंक, लाख व कात तयार करण्याचा व्यवसाय या वन प्रकारात चालतो.
  • आयुर्वेदिक तेल तसेच औषधी तयार करून ती विक्री करण्याचा व्यवसाय चालतो. तेंदूची पाने गोळा करून विडी उद्योगासाठी त्याचा वापर केला जातो.
  • इंधन म्हणून यामधील वृक्षांचा वापर होतो.

6. उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये:

वार्षिक पर्जन्य: 80 से. मी. पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात.

प्रदेश:  दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्याच्या लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगररांगांवर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी झाडे आढळतात. पुणे, सातारा, सांगली व अहमदनगरच्या पूर्व भागात, तसेच सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भ भागातही टेकड्यांवर काटेरी अरण्ये आहेत.

वृक्षांचे स्वरूप:

  • या वन प्रकारातील वृक्षांच्या फांद्यांना काटे असतात
  • पानांच्या टोकावर शेवटी काटे असतात.
  • पाण्याच्या शोधार्थ वृक्षांची मुळे जमिनीत खूप खोलवर गेलेली असतात.
  • वृक्षांच्या पानांचा आकार लहान असतो.
  • वृक्षांचे लाकूड टणक असते व वृक्षांची साल जाड असते.
  • कोरड्या ऋतूतही ही वृक्षे व वेली तग धरू शकतात. (जिवंत राहू शकतात.)

वृक्षांचे प्रकार: काटेरी अरण्यात बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष सर्वत्र आढळतात. निंब झाड अनेक ठिकाणी पाहावयास मिळते.

आर्थिक महत्त्व:

  • आर्थिकदृष्ट्या ही वने फारशी महत्त्वाची नसतात.
  • वनातील वृक्षांचा वापर हा जळाऊ लाकूड म्हणून केला जातो.
  • काही वृक्षवेलींचा वापर हा आयुर्वेदिक वनौषधींसाठी केला जातो.
  • लाकडाचा उपयोग हा मुख्यत्वे शेतीची अवजारे तयार करण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागात कुंपणासाठी या वृक्षांचा व फांद्यांचा वापर केला जातो.
  • सुगंधी अत्तर, तेल, औषधासाठी आवश्यक रोशा (सोफीया व मोतीया), कुशल आणि शेडा जातीचे गवत मिळवून त्याचा उपयोग केला जातो.

7. किनारपट्टीवरीलखारफुटीचीकिनारपट्टीवने (खांजणवने):

प्रदेश: महाराष्ट्राच्या पश्चिम कनारपट्टीलगत नद्यांच्या मुखाशी भरती-ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान खाड्यांची निर्मिती झाली आहे. या खाड्यांच्या दलदलयुक्त खाजण क्षेत्रात खारफुटीची बने खाजण वने आढळतात. महाराष्ट्रातील एकूण  वनामध्ये या वनांचे प्रमाण नगण्य म्हणजे 0.9% इतके आहे. आचरा, रत्नागिरी, देवगड, वैतरणा, मुंब्रा, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा या किनारी प्रदेशाचा समावेश होतो.

वृक्षांचे स्वरूप:

  • या प्रकारची वने दाट व एकमेकांत वाढलेली असतात
  • दलदलयुक्त प्रदेशातून ही बने वर आलेली असतात
  • वृक्षाच्या खोडाला खूप मोठ्या प्रमाणावर उपमुळे असतात त्यामुळे वृक्षाच्या खोडाला खूप मोठा आधार असतो.
  • वृक्षांची उंची फार नसते.
  • वृक्षे ही झुडपांच्या स्वरूपात दाट वाढलेली असतात.
  • ही बने क्षारयुक्त पाणी असलेल्या भागात आढळतात.
  • सिंधुदुर्गच्या आचरा खाडीच्या किना-यावर कांदळ मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यावरून या वनांना कांदळवन असे संबोधतात.

वृक्षांचे प्रकार: चिपी, आंबेटी, काजळा, मरांडी, कांदळ,  तिवर या जातीच्या वनस्पती आढळतात.

आर्थिक महत्त्व:

  • आर्थिकदृष्ट्या ही वने फारशी महत्त्वाची नसतात.
  • लाकूड हलके असल्यामुळे व पाण्याच्या संपर्कात वाढल्यामुळे होड्या व बोटी तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो.
  • जळाऊ लाकूड व इंधनासाठी याचा वापर होतो.
  • समुद्रातील जलचर प्राण्यांच्या आश्रयासाठी या वनांचा वापर होतो.
  • या वनांमुळे सागरकिनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते.

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. खालीलपैकी कोणते झाड उष्ण कटिबंधीय काटेरी वनात आढळत नाही?

  1. बाभूळ
  2. निंब
  3. सागवान
  4. हिवर

उत्तर: 3

प्रश्न 2. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने किती वार्षिक पर्जन्य असलेल्या भागात आढळतात?

  1. 160 से 250 से.मी
  2. 120 से 160 से.मी
  3. 80 से 120 से.मी
  4. 250 से.मी पेक्षा जास्त

उत्तर: 2

प्रश्न 3. महाराष्ट्रात खाजणवने कोणत्या भागात आढळतात?

  1. विदर्भ
  2. पश्चिम महाराष्ट्र
  3. मराठवाडा
  4. कोकण

उत्तर: 4

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार किती आहेत?

महाराष्ट्रातील वनांचे मुख्य 6 प्रकार पडतात.

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.